कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रायपाटण या प्रगतीशील गावातील श्री. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई यांनी या फर्मची स्थापना केली आहे. स्वतः श्री. महेश कोकणबाग ऍग्रो टुरिझम फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षपदावर असल्याने विविध सेवाभावी कार्याशी अगदी जवळून संबध रोजचाच आहे. मात्र शेती व गोवंशसंवर्धन या क्षेत्रात कार्य करताना समाजातील अनेकांना विविध सेवा व्यावसायीक तत्वावर हव्या असल्याचे दिसून आले. श्री. महेश यांनी आपल्या कुटुंबियांसह आपल्या परिसरातील बेरोजगार व हुशार होतकरू तरूण युवकांना हाताशी घेऊन शेती, तसेच गोवंशसंवर्धनाची विविध कामे व्यावसायीक तत्वावर करून देण्याची सुरूवात केली. या कामात त्याने अनेकांना आपल्याशी जोडून घेतले. पीकतज्ञ्ज, मृदापरीक्षण प्रयोगशाळा, विविध कंत्राटदार अशा साखळीची निर्मीती करीत महेशने या व्यवसायाचा पाया घातला.
स्वतःचे बलस्थान म्हणजे आंबा व काजू या नगदी पीकांसह कोकम ( रातांबा ), नारळ, चिकू या पीकांसह अननस, पपया, मसालापीके आदी विविध उत्पादनक्षम बागांची निर्मीती करून ज्यांना स्वमालकीची बाग किंवा उत्पादक बगीचा साकार करावयाचा असेल त्यांना त्यांच्य़ा मनाप्रमाणे बागबगिचा साकार करून देणे हे महेशचे मुख्य काम असते.
नवजीवन एग्रो सपोर्ट सर्व्हीसेस व कन्सल्टन्सी ही फर्म विविध सेवा व्यावसायीक तत्वावर पुरविते. हाती घेतलेली कामे चोख व कटाक्षाने वेळेत तसेच तत्परतेने करण्याची खात्री देऊनच या फर्मची वाटचाल चालू आहे.
एका अत्यंत शांत व निसर्गरम्य ठिकाणी एका सुप्रसिद्ध रिसॉर्टला बसलो होतो. समोर विस्तीर्ण माळरान होतं. घनगर्द झाडी असलेल्या या माळरानावर छान रचना करीत विकासकानं एक पाश्चात्य शैलीतलं सुंदर छानदार बांधकाम विकसीत केलं होतं. या परिसरातील जमिन सुमारे १०० एकरच्या आसपास होती. वेगवेगळ्या ठिकाणी पाश्चात्यशैलीतले बंगले, स्टुडीओ अपार्टमेंटस, सामुदायीक क्लब हाऊस, मंदिर अशा विकसनात मी फिरत असताना मनात विचार आला की कसं जमलं असेल एवढ्या सहजतेनं ? किती रक्कम लागली असेल इतकं सारं करायला ? एवढी अवाढव्य रक्कम कशी उभारली या उद्योजकानं ? मनातील प्रश्न संपणारे नव्हते अन् त्यांची उत्तरंही मिळणारी नव्हती. सायंकाळी एका कामगारानं मात्र आपल्या मालकाची यशोगाथा मनापासून सांगितली. ( त्याच्या मतानुसार ही यशोगाथा फक्त त्यालाच माहित होती, अन् मी कुणाला ती सांगू नये हे आवडतं वाक्यही सांगायला तो विसरला नाही. ) या विकासकाचे वडिल एका शासकीय खात्यात नोकरीला होते. आपल्या मुलाचा कल ओळखून त्यांनी तेव्हापासूनच हा गावाबाहेर असलेला गवताचा पडिक माळ त्यांच्या नजरेत भरलेला होता. बाबांची दूरदृष्टी खूपच चांगली होती. या माळावरील मालकांच्या त्यांनी एक एक करून जमिन खरेदीचा सपाटाच लावला. १९७५ ते १९८५ या काळात जेव्हा जमिन खरेदीवर उद्योगजगताची नजर नव्हती, जेव्हा जमिनीचं मोल कुणालाच कळत नव्हतं तेव्हाचा हा काळ. या बाबांनी एकाच जागेवर हा माळ, हे जंगल खरेदी करून ठेवलं. तेव्हा या बाबांना सगळ्यांनी वेड्यातच काढलं, कशाला ही जमिनखरेदी केलीय ? या जमिनीत डुक्कर, कोल्ही, कुत्रीही जाणार नाहीत, घेऊन बाबा काय करणार ? वगैरे वगैरे.
या काळात बाबांनी उसनवारी केली, दागिने गहाण ठेवले, आपल्या शासकीय खात्याचं कर्ज काढलं, ( सर्व सनदशीर वैध मार्गांनी त्यांनी प्रचलित भाषेत भांडवल उभारणी केली. ) ही भांडवल उभारणी करताना बाबांना अनेकवेळा अपमानास्पद प्रसंगाना सामोरं जावं लागलं. बाबा ध्येयवादी वगैरे नव्हते पण त्यांना जमिनजागेचं महत्त्व कळलेलं होतं. आपल्या हेतूची साध्यता होईपर्यंत त्यांना अथक प्रवास चालू ठेवला. त्यांची अनेकदा आर्थिक कुचंबणा झाली, कुटुंब चालवताना थोडी ओढाताण झाली पण सारं त्यांनी सोसलं. सुमारे शंभर एकरचा एकक्षेत्री माळ त्यांच्या नावे झाला. ही साठा उत्तराची कहाणी बाबांच्या निवृत्तीच्या आसपास पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.
आज या रिसॉर्टची सर्वत्र वाहवा आहे, नांवलौकीक आहे. सुदैव म्हणा किंवा बाबांची पूर्वपुण्याई म्हणा त्यांचा मुलगा सुपुत्र निघाला. सूनही कर्तबगार निघाली. मुंबईत व्यावसायीक क्षेत्रात कार्यरत असलेली ही जोडी गावाकडे स्थायीक होण्यासाठी पुन्हा माघारी निघाली. आपल्या या वडिलोपार्जित शेतावर त्यांचे प्रयोग सुरू झाले. कोणतीही भाजी, पीकं, फळफळावळ त्यांनी नैसर्गिक पद्धत, सेंद्रीय पद्धत या दोन पद्धत्तींचा संगम साधत त्यांनी शेती फुलवली. आज त्यांच्या शेतीच्या यशोगाथा सर्वांच्या चर्चेचा विषय असतात. त्यांच्याकडील पीके वाट्यालाही येत नाहीत. घरी सुट्टीत रहायला आलेले पर्यटक शेतातील उत्पादन जाताना घेऊन निघतात. या दोघा दांम्पत्याला आजवर एकही उत्पादन बाजारात न्यायला लागलेलं नाही. ही वाढती मागणी लक्षात घेता आता श्री.सौ. जोडी नव्यानं शेत वाढवण्याच्या कामाला लागलेली आहेत. नांगरणी, जमिनीचा पोत सुधारणे, शेत तयार करणे आदी कामे लगबगीनं सुरू आहेत. श्री.सौ. जोडी अत्यंत आनंदात, अगदी लग्नाच्या वेळी असते तशा लगबगीनं कामाला लागलीत. मला हे सारं पाहून त्यांच्या बाबांच्या लावलेल्या फोटोकडे पाहून वाटलं की त्यांच्या तपाला चांगलाच बहार आलाय. आता बाबा हयात नसले तरी त्यांना हे सारं दिसत असेलच ही भावना दोघांचीही आहे. मी आपणाला ही यशोगाथा सांगण्याचं कारणही तसच आहे.
कोणतीही कथा ऐकल्यावर अनेकदा तात्पर्य सांगावं लागतं. सांगितलं नाही तरी पट्टीचा कान तयार असलेल्या वा वाचनाचा डोळा तयार असलेल्या व्यक्तीला या कथेचा सारांश, तात्पर्य वेगळं सांगण्याची तशी गरज नाही. जमिनीचे भाव काळानुरूप वाढतात हे खरंच आहे. जमिनीतील गुंतवणूक कधी वाया जात नाही हेही खरंच. सातबारा विकसीत करणं ही एक तपश्चर्या आहे. बाबांनी जमिन घेतली, मुलानं ती विकसीत केली. कहाणी एवढ्यावरच संपत नाही. आज अनेक गुंतवणूकदार बाबांच्या मुलाशी करारमदार करतात.
शंभर एकरपैकी चाळीस एकर स्वतःसाठी ठेवत उरलेल्या जमिनीचा विकास करीत दामदुप्पट दरानं मुलानं विकसन करून विक्री केलीय. अशाच एका दुस-या पर्यटनस्थळाचीही कहाणी अशीच विलक्षण आहे. विलक्षण अशासाठी की हे पर्यटनस्थळ काही एका रात्रीत तयार झालं नाही. या पर्यटनस्थळाच्या शेजारच्याच रस्त्यानं जाताना अनेक वर्ष एक फलक लागलेला दिसायचा. या फलकावर या मालमत्तेच्या मालकीणबाईंचं नाव झळकत असायचं अन् त्याखाली लिहिलेलं असे, की त्यांची मालमत्ता आहे, कोणाची काही हरकत वगैरे असेल तर वहिवाट चालू असतानाच हरकत करावी. ( कोकणातील जमिनींची ही गंम्मत असते, वहिवाट व कूळ या शब्दाभोवतीच सर्व मालमत्ता फिरत असतात. ) आज कोकणातील नावारूपाला आलेलं ग्रीन रिसॉर्ट आहे ही मालमत्ता ¡ कोकण असो किंवा अन्य ठिकाण ....... मालमत्ता विकसीत करणं....नावारूपाला आणणं......मालमत्तेत गुंतवणूक करणं...... मालमत्तेचं विकसन व मार्केटींग......सारंच कसं माणसाला गुंतवून ठेवणारं....... प्रश्न इतकाच आहे की आपण कसं याकडे बघायचं..... गुंतून पडायचं की यातून बाहेर पडायचं......सातबारा खरेदी केला किंवा मालमत्ता खरेदी केली की या वाटेवरून प्रत्येकाला जावंच लागतं. अशा अनेक बाबतीत माझी मतं व अनुभव मी लिहीणारच आहे.
( माझा लेख वाचणा-या मंडळींना किंवा वाचकांना विनंती आहे, आपण हा लेख वाचल्यावर कृपया कोणत्याही रिसॉर्टच्या नावाशी किंवा मालकाशी या लेखाचा संबंध जोडू नये, आपणाला काही लागेबांधे, समानदर्शी धागेदोरे आढळले तर तो योगायोग नव्हे तर कोकणात जमीन खरेदी करून विकसीत करणा-या सर्व उद्योजकांची कहाणीच अशा खाचखळग्यातून सुरू होते व सर्व प्रवास कमी अधिक फरकाने याच चाकोरीतून सुरू राहतो. )