कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रायपाटण या गावातील महत्त्वाकांक्षी युवक म्हणजे महेश पळसुलेदेसाई. आज आपल्या “ नवजीवन ऍग्रो सपोर्ट सर्व्हीसेस & कन्सल्टन्सी ’’ या फर्मतर्फे तब्बल १०० एकरचे व्यवस्थापन अभिनव पद्धत्तीने करणा-या महेश पळसुलेदेसाई यांचेबाबतीत संक्षेपातील माहिती –
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथून पदवीचे शिक्षण घेऊन “ चला पुन्हा खेड्याकडे ” या मंत्राप्रमाणे १९९९ साली रायपाटण या गावी येऊन अभिनव पद्धत्तीने, सहकारी तत्त्वावर आणि व्यावसायीक शेतीला सुरूवात केली.
राजापूर तालुक्यातील पूर्व विभागातील रायपाटण या गावाचे सलग पाच वर्षे बिनविरोध पद्धत्तीने उपसरपंचपद भूषविले तर सध्या दुस-या वेळी ग्रामपंचायतीत सदस्यपदावर कार्यरत.
२००९ साली स्वतः पुढाकार घेऊन शिक्षण आणि शेती या क्षेत्रात कार्यरत असणारी “ नवजीवन विकास सेवा संस्था ” ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली.
प्रो. प्रा. महेश यांनी आपण अध्यक्ष असलेल्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था नवजीवन विकास सेवा संस्थेतर्फे गोवंशसंवर्धन, भाजीपाला पीके, हळद व आले लागवड, दुग्धव्यवसाय, सेंद्रीय व नैसर्गीक शेती, झीरो बजेट शेती, फलोत्पादन, फळप्रक्रिया आदी विषयांवर विविध कार्यशाळांचे आयोजन केलेले आहे. प्रो.प्रा. महेश यांनी २०११ साली राज्यस्तरावरील गोवंशप्रेमी ग्रामविकास संमेलन या देशी गायींच्या संदर्भात लक्षवेधी संमेलन श्री. पोपटराव पवार ( सरपंच हिवरेगाव बाजार जि. अहमदनगर), श्री. सुनील मानसिंहका ( गोवंश अनुसंधान केंद्र देवलापार नागपूर ) आणि श्री. आदीनाथ चव्हाण ( संपादक दै. ऍग्रोवन ) यांचेसह कोकणातील ५ आमदार, आणि राज्यातील असंख्य शेतकरी व गोपालक यांचे उपस्थितीत लांजा या गावी आयोजित केले.
प्रो.प्रा. महेश यांनी परिसरातील महिला आणि बेरोजगार यांचेसह नेहमी विविध ठिकाणी कामावर जाणा-या शेतमजूरांचे, कंत्राटदारांचे संघटन करून यांना कोकणबाग या संघटनासाठी एकत्र केले आहे.
प्रो. प्रा. महेश यांनी कोकणातील भाजीपाला ( जसे मुळा, लाल पालाभाजी, भेंडी, मधुमका, चवळी, वाल, पडवळ, दोडका, काकडी, मोहरी, कांदा, कारले अशा नगदी पीके देणा-या भाज्या ) या पीकांचा अभ्यास करून या पीकांतून व्यावसायिक शेती करण्यासाठी काही नमुने तयार केलेले आहेत. फुलशेती यासंदर्भातही महेश यांनी कामकाज केलेले आहे.
प्रो.प्रा. महेश यांनी विदिशा गार्डन्स या स्वतःच्या कोकणबागेतील ग्राहकांच्या संकल्पनेतून व सूचनेनुसार कोकणात स्ट्रॉबेरीची शेती करून स्ट्रॉबेरीच्या पाच प्रकारचे भरघोस उत्पादन घेतले.
प्रो.प्रा. महेश यानी फलोत्पादन शेती यशस्वी करीत आंबा, काजू, कोकम, नारळ या पीकांच्या माध्यमातून तयार झालेल्या कोकणमेव्याचे यशस्वी मार्केटींग करीत गिफ्टबॉक्सचा यशस्वी व्यवसाय केला.