Blog Details

हापूस बागायतदार बना !

  • 01-04-2021
  • by श्री. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई ( अध्यक्ष, कोकणबाग ऍग्रोटुरीझम शेतकरी उत्पादक कंपनी – राजापूर )
।। श्रीपादश्रीवल्लभ प्रसन्न ।।
श्री. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई ( अध्यक्ष, कोकणबाग ऍग्रोटुरीझम शेतकरी उत्पादक कंपनी – राजापूर )

( कोकणातून पोटापाण्यासाठी विस्थापित झालेल्यांसाठीच नव्हे तर चाकरमानी, अन् हापूसआंबा फळावर प्रेम करणा-या प्रत्येक खव्वैयासाठी हा लेख आहे. कोकणात आपली जमीन असो वा नसो, मात्र हापूसपेटी खरेदी करणा-या प्रत्येकाला एक तरी हापूस कलमाचे झाड लावायचे आवाहन करणारा हा लेख काही वेगळा आशय सांगणारा आहे. – श्री. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई )

हापूस बागायतदार बना ! हापूसपेटी खरेदी करताना आपण हापूसआंबा बागायतदार का बनू नये ? हा विचार कधी आपण कधी करतो का ? आपण हापूसआंबे खरेदी करताना आपल्या चौकोनी कुटुंबासाठी दोन डझनाची एक किंवा चार डझनाची एक पेटी खरेदी करतो. साधारणपणे मे अखेरपर्यंत शहरातील घरात किंवा कुटुंबात हापूस खरेदीचे दोन ते राऊंड होतातच. आपल्या कुटुंबात हा फळांचा राजा येताना आपणच या फळांचे किमान एक कलमझाड लावले तर ? आपणच आपल्या गावाकडे ( असल्यास ) जमीनीत एक हापूसकलम लागवड केले तर ? आपण असे केले तर किमान तिस-या ते चौथ्या वर्षापासून किमान दोन डझन हापूस स्वतःच्या घरचे हक्काचे या नात्याने खाऊ शकतो. आपण ही इच्छाशक्ती आणि यामागील गणित समजून घेणे गरजेचे आहे.

दोरी स्वस्त झाली म्हणून कोणी फास लावून घ्यायला दोरी खरेदी करत नाही असे म्हणतात. हापूसची बागायत करणे म्हणजे क्षणिक मोहापोटी असा फास लावून घेण्यासारखे आहे असेही कुणी म्हणेल ! तर कुणी म्हणेल की घोड्याच्या पायातला नाल सापडला म्हणून कुणी घोडा खरेदी करीत नसतो. हो या दोन्ही गोष्टी समजण्यासारख्या आहेत. आपणाला हापूस कलमाचे झाड लावणे सोपे आहेच अन् त्यापेक्षा मनात आणले तर हापूसची बाग तयार करणे हेही सोपे आहे, अर्थातच या दोन्हीही बाबींकडे गुंतवणूक या नात्याने पाहणे गरजेचे आहे. हापूसचे कलम फारच संवेदनशील असते. हवामान, खाऊ, खत व मशागत आणि त्याची निगा व देखभाल या सर्वच बाबतीत फळांच्या राजाचे हे कलम सांभाळणे म्हणजे थोडी मेहनत आलीच. आपण आपल्या बाळाची असो किंवा गाडीची किंवा मोबाईलची, काळजी ही घेतोच घेतो. बास्स, थोडं याप्रमाणेच आपण हापूस कलमाचीही काळजी घेऊ शकतो, एवढं केल्यास पुढील चौथ्या वर्षापासून आपल्या घरचे हापूस म्हणून आपण हक्कानं मिरवू शकतो !

आपण हापूस कलम लावण्यापूर्वी मी काही गोष्टी गृहीत धरल्यात, जसे तुम्ही वर्षातून किमान दोन ते तीनदा गावाकडील घरी जात असाल, कदाचित तुमच्या घरी तुमचे कुणी ना कुणी नातेवाईक किंवा भाऊबंद असणारच. कदाचित तुमचे आई-बाबा, तुमचे काका-काकू किंवा बहिण-भाचे वगैरे कुणी ना कुणी असणारच ! बस्स, यांच्याशी तुमचं ट्यूनींग असायला हवं, तुमचं आमचं जमलं किंवा आमचं ठरलंय असं तुम्ही ठरवलंत तर वेळ कशाला ? तुम्ही बागायतदार होऊ शकता. आता प्रश्न आहे की तुम्ही किती कलमं लावायची ? एक की दोन की बाग करायची ? या प्रश्नांची उत्तरं शोधताना थोडा अभ्यास असला पाहिजे हे मात्र खरं. आपण कोकणातीलच असू तर प्रश्न नाही.

आपल्या कानावर कधी ना कधी गुंठा, एकर वगैरे शब्द कानावरूनं गेलेले असतातच. आपणाला हापूसची झाडं तर लावायची आहेतच, आपल्या घरचे हक्काचे हापूस खायला आणायचे आहेत. या सर्वाचं अर्थकारण समजून घेतलं तर पाहिजे. आपण त्या बाजूकडे वळणार तर आहोतच. आपणाला पडणारा प्रश्न हा आहे की आपली जमीन आहे का ? आपण हापूसचे कलम कसे लावू शकतो ? आपला घरचा सात-बारा उतारा आहे का ? असल्यास आपली जमीन कुठे आहे ? आपली जमीनच नसेल तर ? नविन जमीन खरेदी करायची असेल माझ्या बजेटात ती बसेल का ? मला कमीत कमी किती रक्कम लागेल एका कलमासाठी जमीन घ्यायला ? आपण क्षणभर या सगळ्यांना बाजूला ठेवूया. आपणाला काहीच शक्य नसलं तर अखेर आपण आपल्या गच्चीवर किंवा आपल्या बाल्कनीत एक भली मोठी कुंडी आणून हापूसचा एक बॉन्साय तर करू शकतो !

तर मंडळी आता आपण मनावर घेतलंय खरं की आपण हापूस कलमलागवड करायची. साधारणतः एक कलम लावायला किती खर्च येतो ? कोणत्या कलमाची निवड करायची ? सहा महिने शिंपण केलेले कलम खरेदी करावे की तीन वर्षे पाणी घालून शिंपण केलेले पत्र्याच्या डब्यातील कलम खरेदी करावे ? कलम लागवड केल्यावर पुढे वर्षभरात कोणती मेहनत करावी ? कोणकोणती खते व औषधे द्यावीत ? ही खते व औषधे द्यावीत की देऊच नयेत ? नैसर्गिक पद्धतीने मेहनत व मशागत करावी की सेंद्रीय पद्धत्तीने ? की नैसर्गिक व सेंद्रीय आणि रासायनिक पद्धत्तीचा संगम करावा ? यासारखे विविध प्रश्न आपल्या मनात फेर धरून रूंजी घालतील. या प्रश्नांची सर्व उत्तरे एकाच या लेखात मिळवणे थोडे अवघड आहे. आपणाला सतत हापूस या विषयाचा अभ्यास वर्षभर चालू ठेवायचा आहे. आपणाला मी सर्वप्रथमच बोललो होतो की आपणाला हापूस पेटी खरेदी करतानाच हापूस बागायतदार किंवा हापूस कलमाचा पालक व्हायचे आहे. आपण या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. चला तर आपण आता हापूस बागायतदार किंवा आंबा कलमांचा शेतकरी होण्याच्या वाटेवरचा प्रवास सुरू करायचा आहे.

हापूस या आंब्याच्या जातीची चर्चा आणि बातम्या वर्षभर सततच आपल्या डोळ्यासमोर असतात. यावर्षी २०२१ साली तब्बल १ लाख ८ हजाराला हापूसची पेटी विकली गेली ही बातमी धुमाकूळ घालत होती. साधारण दिवाळीच्या आसपास मालवी हापूस दक्षिण आफ्रिकेतून आला, मालवी हापूसची रंगत, मालवी हापूस कसा खपला वगैरे बातम्या आपण सामाजिक माध्यमांवर ( सोशल मिडीयावर – जसे फेसबुक, व्हॉटसअप आणि यूट्यूबवर ) पाहतो व अचंबित होतो. साधारण यातून सावरतो न सावरतो तोच जानेवारी फेब्रुवारीत कोकणातील कोणाचीतरी हापूस पेटी बाजारात दाखल होते. बाजारात दाखल होणा-या हापूसच्या पेटीला मिळणारा दर, हापूस पेटी दाखल करणा-या शेतक-याचे कष्ट अन् याबरोबरच कधी सिध्दीविनायक मंदिरातील हापूसपेटीची पूजा तर कधी फाईव्हस्टार हॉटेलातील हापूसपेटीचा लिलाव ! हापूस हा फळांचा अनभिषिक्त राजा आहे, त्याचे आगमन डौलानं होते आणि त्याच्या आगमनासह ते त्याच्या विक्रीच्या कथाही तेवढ्याच चित्तथरारक आणि मनमोहक ! हापूसच्या कथाच अशा रम्य आहेत की त्याच्यापुढे युद्धाच्या कथाही फिक्या वाटाव्यात ! हापूस बागायत करून कोणी लखपती होतो तर कोणी गेल्यावर्षी झालेला तोटा भरून काढताना पुढीलवर्षी दमछाक सोसतो.

हापूसचा बाजारच असा असतो की बाजारात जास्तीत जास्त लवकर दाखल होऊन प्रदीर्घ काळ दमदारपणे बाजारात जास्त होणा-या आवकेपुढे टीकून राहणे ही खरी कसरत असते. या सर्वात जो सतत बाजाराचे भान ठेवून टीकून राहतो तोच बागायतदार हापूस का सिकंदर ठरतो. आपण काही एवढी झेप घेऊच असे काही नाही, मात्र किमान आपण एक कलम लागवड तरी करू शकतो किंवा घराच्या परसदारात काही कलमे लावू शकतो, किंवा जमल्यास जमीनजागा खरेदी करून एखादी बाग गुंतवणूक या नात्याने तयार करू शकतो.

बागायतदार शेतकरी होणं हे लग्न करून संसाराला सुरूवात करण्यासारखं आहे. सहजीवनातली मर्म ज्यांना समजली त्यांचा संसार सुखाचा होतो. आगदी याप्रमाणेच कोकणातील बागायतदार व्हायचं असेल तर काही मर्म समजून घेणे ही गरज आहे. कोकणातील शेतकरी मुळातच स्मार्ट आहे. कोकणातील शेतक-याला विक्रीची विविध दालने डोळ्यासमोर आहेत. कोकणातील भूमीपुत्राचं नाळ ज्या हापूसशी जोडलं गेलं आहे त्याच कोकणी माणसाचं नाव घेताच हापूस अन् मासे, हापूस अन् काजू, नारळ, सुपारी, कोकम, करवंद या सर्वाची माळ आठवणींच्या रूपानं फेर धरते. आमच्या कोकणी माणसाच्या या सा-या कोकणमेंवा वस्तूंची जंत्रीच अशी आहे की या सर्व वस्तू वर्षभर सतत बाजारात खपतच असतात.

माझ्या लेखाच्या सुरूवातीलाच मी म्हटलंय की हापूसपेटी घेताना हापूस कलम लागवडीचा विचार करा. आपलं हापूस कलम कदाचित तीन चार वर्षांनी तुम्हाला हापूस फळे द्यायला लागेल, पण हापूसच्या निमित्तानं तुम्ही कोकणाशी जोडले जाल. आपण हापूसमुळे कोकणाशी नव्हे तर शेतीशी पुन्हा जोडले जाल, शेतकरी बागायतदाराच्या दैनंदिन सुखदुःखाशी तुम्ही जोडले जाल. आपण एक हापूसचं कलम लावा किंवा दहा हापूसची कलमे लावाल तेव्हा तुम्हाला त्यांच्यावर लक्ष ठेवताना अन् त्यांची प्रगती जाणून घेताना आपोआपच गावाची आठवणही येत राहील. आपणाला येणारी गावाची आठवण ही काव्यमय नसून गावातील तुमच्या कलमाच्या काळजीवाहू बागवानाला चार पैसे देईलच पण तुमच्या मनात गावाच्या आठवणी रूंजी घालतील. आपली गावात जमीन नसली तर आपण जमीनखरेदी करून केलेली बाग किमान एका बागवानाला रोजगार देईल. आपण हापूसची एक पेटी किंवा दोन तीन पेट्या खरेदी करताना हापूस बागायदारच बनायचे ही गोष्ट थोडी जरा कठिण वाटली तरी अशक्य नाही.

" आंबा पीकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो " बस्स आपण याचा अनुभव घ्यायचाय, चला तर मग..... कोकणातील हापूस बागायतदार बनूया. कवीवर्य विं. दा. करंदिकर यांच्या कवितेच्या ओळींची मोडतोड करताना त्यांची माफी मागून असे म्हणुया...
हापूसपेटी घेणा-याने घेत जावी, हापूसपेटी विकणा-याने विकत जावी,
एके दिवशी पेटी घेता घेता, हापूसपेटी घेणा-याने हापूस बागायतदारच व्हावे...
हापूस बागायतदारच व्हावे, हापूस बागायतदारच व्हावे !


Recent Comments

Add Comment