Blog Details

चवीचे वारसदार

  • 24-04-2021
  • by महेश पळसुलेदेसाई
।। श्रीपादश्रीवल्लभ प्रसन्न ।।
चवीचे वारसदार
( हापूसच्या घोंघावत्या झंझावातात अन् वारेमाप कौतुकात देशी रायवळ आंब्यांच्या जाती कुठच्या कुठे भिरकावल्या गेल्या. फलोत्पादन योजनेच्या अनुदानावर हापूसने रायवळला हद्दपार केलं, अन् रायवळवर बांधलेल्या कलमांनी देशी जातींना नामशेष केलं. याशिवाय राहीलेली उरलीसुरली कसर लाकूडतोड माफीयांनी आणि जेसीबीवाले अन् हायवेच्या चौपदरीकरणात देशी व रायवळ झाडे नामशेष झाली. गावातल्या बांधावर आणि घरासमोरच्या खळ्यात, परसवात असलेली रायवळी आंब्यांची झाडं आता बघायलाही उरलेली नाहीत. देशी आंब्याच्या चवींचा आणि गुणधर्मांच्या आठवणी काढत लिहलेला हा वेगळा लेख ! )

गोठांब्यासारखा गोल पिवळाधम्मक आंबा मिळताच मला खूप खूप आनंद झाला. खळांब्यासारखा आंबा कधी मिळेल याची प्रतिक्षा मनातल्या मनात सुरू झाली. कधीतरी तोही मिळेल ही मनाची समजूत घालता घालता अखेर तोही सापडलाच. मला छंदच जडला जणू, वेगवेगळ्या आठवणीतल्या चवींच्या शोधाचा. सगळ्या चवी अजून जीभवर जशास तशा ताज्याच्या ताज्या आहेत. जेव्हा हापूसचा बाजारात धिंगाणा नव्हता तेव्हाच्या पहाटेला मी आणि बाबा रात्रभर झाडाखाली पडलेले आंबे गोळा करायला संपूर्ण परसवात ( परसदारी ) झपाटल्यागत फिरत असू. आमच्या प्रॉपर्टीच्या सगळ्या सीमांवरती एक चांगलीच पहाट प्रदक्षिणा व्हायची जणू !

रायवळ म्हणजे झटकन समजावायचं तर गावठी आंबा, सध्याच्या भाषेत बोलायचं तर देशी आंबा. देशी किंवा रायवळ म्हटलं की तो शंभर टक्के नैसर्गिकच हे ओघानं आलं. सेंद्रीय पद्धत्तीत थोड्या प्रमाणात तरी खते व औषधे वापराला परवानगी असते, पण नैसर्गिक म्हणजे शून्य टक्के खतांचा व औषधांचा वापर. मला वाटतं कदाचित यामुळेच रायवळच्या सर्व जाती म्हणजे प्रत्येक चवीचा एकेक अविष्कारच जणू ! रायवळच्या झाडाला फळे यायलाच किमान १० ते १५ वर्ष लागतात. रायवळच्या झाडाला मातीत घट्ट रूजायला आणि निसर्गातील वादळ वा-याशी तोंड द्यायला किमान पंधरा वर्षे झगडावे लागते. या झाडावर ना कोणी रासायनिक फवारण्या करीत ना कोणती रासायनिक खते वापरत. रायवळची ना कुणी पद्धतशीर लागवड केलेली असते, ना कुणी त्यांची खास विशेष बाग करीत. रानोमाळ ही झाडं उगवतात, वाढतात, पोसतात, कुणी पाणी घातलं, मेहनत केली ना केली तरी आपलं खास वेगळं अस्तित्व टीकवून ठेवणारी ही देशी रायवळ जमात आज आठवणीत रूंजी घालते मनात !

आमची केवढी लगबग असायची पहाटेला. बाबा दूध काढायला लवकरच उठले की मला हाक मारून सांगत की चल, जा, गोळा करून आण आंबे. आमच्या घराच्या समोरच खळ्यात ( अंगणात ) असलेला खळांबा म्हणजे वटवृक्षासारखा वर विस्तृत पसरलेला. साधारणपणे खाली दहा-बारा फूटाचे भक्कम सात-आठ फूटांचे विस्तृत गोलाई असलेले खोड. या खोडाच्या वर इंग्रजी व्ही आकारात दोन पुन्हा फाटे, तेही एवढे मजबूत की जणू दोन नविन झाडं. असा हा खळांबा, घरासमोरच्या खळ्यातला, अंगणातला म्हणून खळांबा, गोठ्याजवळचा एकेरी उंच तो गोठांबा, भाजीच्या मळ्याजवळचा कोप-यावरचा तो भाजी आंबा, देठाजवळ चट्टा असलेला तो लासांबा, कोकमासारखा लालेलाल तो रातांबा अशी वेगवेगळी नावं असलेल्या रायवळ आंब्यांची झाडं माझ्या घराच्या आजूबाजूला ओळीनं होती. माझ्या चुलत आजोबांच्या परसदारी असलेलीही आंब्याची झाडं यात होती. या सर्व झाडांखाली जाऊन पहाटे आंबे गोळा करण्यातील मजा काही और होती. हातातली सेलवरची बॅटरी, एका हातातली कापडी पिशवी एवढ्या साधनसामग्रीवर आंबे गोळा करायची फेरी व्हायची. त्यावेळी प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा आजच्याएवढा वावर नव्हता.

आम्हाला तेव्हा भिती असायची की आपण नाही लवकर गेलो तर अमकी तमकी बाई आंबे गोळा करून जाणार, व्हायचंही तसंच. आम्हाला चुकून पहाटे उठायला जर उशीर झालाच तर दुस-याने आंबे आमच्या अगोदर गोळा करून नेलेले असत. यानंतर दिवसभर फक्त तर्क वितर्क लढवत असू मी अन् आई की कोण बरं एवढ्या लवकर उठून आलं असेल ?

पहाटे पहाटे गोळा करून आणलेल्या रायवळ आंब्यातील गोड चवीच्या आंब्यांवर दिवसभर ताव मारायचा किंवा मूड चांगलाच असेल तर साटं घालायची. आम्ही साटं घातलीच तर त्यावर राखण करायला लागायचीच पण त्यापेक्षा त्यावर आच्छादन म्हणून डाळ घालायला लागायचे. एवढे दहा बारा डाळ एकाचवेळी मिळणं मुश्कील ! यामुळे आम्हाला उत्पादन फार मर्यादित घ्यायला लागत असे. आम्ही पहाटे जमवलेले आंबे बाबांकडे दिवसभर येणा-या कुणा ना कुणाला द्यायला लागत. आम्हाला त्यावेळी असा राग यायचा त्या फुकट्यांचा की बस्स रे बस्स. आम्ही लवकरच मग उपाय शोधला होता त्यावरती, अगदी आंबट्टढाण आंबे गोळा करून ठेवायचे, त्यासाठी वेगळी पिशवी करत होतो. दिवसभरात कोणी ना कोणी फुकट्या रिकामटोळ आला की त्याला एक दोन गोड आंब्यांसोबत आंबट्टढाण आंबे मिसळून द्यायचे. आम्ही असे आंबे दिल्यावर पुढे पुढे फार मजेदार प्रसंगही घडत असत. खरं तर पहाटेच्या या आंबे गोळा करण्याच्या मोहिमेला तसा उद्देश तर काहीच नसायचा, ना ती फळं कुठं बाजारात नेऊन विकायची होती, ना कुणाला द्यायच्या हेतूने गोळा करायची. प्रत्येक गोष्ट उद्देशानेच कशाला करायची ? प्रत्येक गोष्टीला उद्देश आला अन् इथेच बहुधा रायवळला कलमाचा शाप बाधला. आठवणींचा पट माझ्या डोळ्यासमोरून झरझर सरकत निघाला. निरूद्योगी दिवसांत साधारणतः ४ थी ५ वी ते ८ वी ९ वी च्या काळात जेव्हा हापूसच्या व्यवसायात नव्हतो तेव्हा सगळा वेळच या रायवळांच्या संगतीत जायचा. या रायवळ आंब्यांना देशी आंबे म्हणायचे हे आमच्या कानावरनंही गेलेलं नव्हतं. देशी विदेशी किंवा रायवळ विरूद्ध कलमी असा इझम तेव्हा नव्हताच. फलोत्पादन आणि पर्यटन मोहिमा आणि शासकीय चळवळी कुठेही नव्हत्या. दिस येतील, दिस जातील भोग सरलं या चालीवरच बहुधा सगळ्यांच चालायचं. मी व माझे बाबाही याला अपवाद नव्हतो.

आंबे विकता येतात, किंवा आंबे विकून पैसे मिळवता येतात हा विचारही मनाला शिवलेला नव्हता. माझे बाबा परसदारी असलेल्या दोन हापूस कलमांचे जीवापाड जतन करीत असत. या दोन्हीही हापूस कलमांची फळं जणू मधाचीच आठवण ! यातील एका कलमाला १९७२ च्या वादळाचा तडाखा बसलेला होता, या कलमाच्या मुख्य फांद्यांना भेगा गेल्या. या कलमाला तोडायचाच विचार होता परंतु कुणीतरी सल्ला दिला की फांद्यांची छाटणी करायची. आमच्या बाबांनी या युक्तीने त्या कलमाचे जतन संवर्धन केलं. दोन्ही कलमांची झाडं आजही भरभरून फळे देतात.

माझ्या आठवणीत आमचे बाबा जेव्हा या कलमांचे आंबे आपल्या स्नेही जनांना आणि संबंधितांना सुपातून भरून देत तेव्हा मला जीवावर यायचं. मनातल्या मनात मी चरफडत असायचा, मला कधी यामागची आर्थिक गणितं कळलेली नव्हती. माझ्या बाबांना जे त्यांचे सहकारी व संबंधित देवघेव किंवा काही संबंध असत त्याची हापूसची फळं देऊन परतफेड असायची. हापूसफळं, फणस, झाडांची जळाऊ लाकडे, माती भरून बैलगाडी, तांदूळ अशा एक ना अनेक वस्तूंची देवाण-घेवाण वर्षभर चाललेली असायची. माझ्या नकळत्या वयात या शेतमालाच्या देवाणघेवाणीने शेतक-याची असहाय्यताच कोरली गेली होती. कोणत्याही कॅलक्युलेटरचा वापर न करता किंवा कोणतीही दिली घेतली पोच न ठेवता कारभार चालतो, कोकणात असे कितीतरी शेतकरी तेव्हा होते असतील जेव्हा त्यांना आपल्याकडील सोन्याचं मोलच कळलेलं नव्हतं. माझ्या बाबांकडून लोणच्यासाठी रायवळ आंब्याच्या कै-या दिल्या जात असत. लोणचं घालायला कसे मस्त आणि आंबट्ट आंबे लागायचे. रायवळच्या ज्या फळाला आत तंतू भरपूर असत ती फळं लोणच्याला जास्त पसंत केली जात असत. दरवर्षी लोणचं घालणं अन् त्यासाठी सामान आणणं हा माझा आवडता उद्योग होता. लोणच्याला सामान आणताना लागणारा हिंग हा इराणी हिंगच लागत असे, लोणच्याला लागणारी मोहरी खास वेगळी असायची. यावेळी गोड अन् चवदार असलेल्या रायवळ आंब्याच्या झाडांचे आंबे लोणच्यासाठी काढायचे नाहीत हा माझा हट्ट असायचा, माझे बाबा कधी तो हट्ट पुरवत तर कधी धुडकावून लावत. लोणच्यासाठीची फळ काढून झाल्यावर पहाटवारीतलं एक एक झाड कमी व्हायचं.

आमच्या दिवसभराच्या उद्योगात झाडाखाली पहारा देण्याचं काम अनिवार्य होतं. रायवळाचं जे झाड पाडाला येऊन आंबे पीकायला लागले की वा-याच्या मंद झुळुकीनेसुद्धा एक दोन एक दोन फळं पडत राहायची. मला व माझ्यासोबत असलेल्या मित्रांना काही कामधाम नसलं की छोटेमोठे दगड गोळा करून नेमबाजी प्रयोग व्हायचा. मला टीकाळीला ( अगदी टोकावरचा ) पीकलेला आंबा दगडाने अचूक देठाचा वेध घेऊन पाडण्यात फार शौर्य वाटायचं. दगडांची रसद पुरवणारी टीम कुणी ना कुणी असायचीच. जेथे दगडही पोहोचणार नाही व वेध घेता येणार नाही अशा फळाला उद्देशून " एक आंबा बिट्टो, एक आंबा बिट्टो, म्हणून काही मुलं आरोळ्या ठोकत असत. योगायोगाने तेवढ्यातच चांगला वेगवान वारा आला तर तोच आंबा खाली पडायचा, जो मुलगा वा मुलगी ओरडत असायची त्याचा अथवा तिचा हक्कच त्या फळावर असायचा. साधारणतः दिवसभरात १० ते १५ फळं एका झाडाखाली मिळायची. दिवसभरात पडलेली फळं गोळा करायला पहाटेच्या पूर्वी दुपारवारी व्हायची. माझे बाबा अशा लोकांना " दुपार ना तिपार, वणवण फेरा " म्हणायचे. अशाप्रकाराने मिळवलेले चोरीमारीचे आंबे शेकड्यावर विकणा-या महिला मला तेव्हा माहित पडल्या. मला माझ्या त्या वयात या महिलांच्या अशा उठाठेवींचा फारच राग यायचा. मी आमच्या परसदाराशिवाय कधी इतरांच्या रायवळ किंवा कलमी झाडांकडे गेल्याचं मला आठवत नाही.

आमची प्रॉपर्टीच एवढी पसरलेली होती की सगळ्या झाडांकडे जाण्याची वारी काढली तरी किमान २ ते ३ तास लागले असते. मघाशी मी जी वर नावं सांगितली त्यात काही ठेवणीतली दूरच्या आंब्यांची नावं सांगितलेलीच नाहीत. साधारणतः अडचणीत आणि दूरवर असलेला, एकलकोंडा तो भुतांबा, फणसाच्या झाडासोबत असलेला फणसांबा, डुक्करांचा वावर जास्त असलेल्या शेतातील डुकरांबा, मूर गावात जाताना वाटेत लागणारा आंब्याचे झाड ते मूरांबा, इतकंच नव्हे तर त्या काळातील बारा बलुतेदार गटातील कुणी झाड लावल्याच्या आठवणी असलेली झाडंही आज मला लख्ख आठवतात. ही झाडं त्या बलुतेदाराची आठवण मनातल्या मनात जागवतात. उत्तर प्रदेशात ज्या कुणी लंगड्या माणसानं आपण खाल्लेल्या आंब्याच्या बाठा दारात लागवड केल्या त्या जातीवरून लंगडा ही जात सुप्रसिद्ध झाली. कोकणातील आंब्यांची नावे हा एक वेगळा विषय होईल सबब तो आवरता घेणं योग्य !

माझ्या नव्याने केलेल्या हापूस बागेतून संध्याकाळ होताच घरी निघालो होतो. मला वाटेत एक असाच पीकलेला पिवळाधम्मक रायवळ आंबा झाडाखाली पडलेला मिळाला. कुठलाही संयम न बाळगता मी तो चाखला, थेट गोठांब्याची आठवण मनाच्या कप्प्यातली जागी झाली. होय, हा गोठांब्याचाच मुलगा, माझ्या नजरेसमोरचा गोठांबा पंचवीसवर्षापूर्वीचा तरळला, गोठांबा, खळांबा काळाच्या ओघात, घराला व गोठ्याला त्यांच्या वयोमानानुसारचा कोरम झालेल्या अवस्थेमुळे तोडावे लागले असले तरी माझ्या नजरेसमोर त्यातल्या एका फळाच्या बाठेपासूनचा आंबा जशास तशी चव देणारा मिळाला होता. मला पुढे खळांब्याचा वारसही नदीजवळच्या फणसाच्या झाडासोबत सापडला. बिटकी, टोकरांबा, रातांबा यांचे वारसही कुठे ना कुठे सापडतील या आशेवर मी आहे. माझ्याकडून या रायवळ आंब्यांच्या झाडांच्या मुलांचा वारसतपास चालू आहे. तलाठी प्रतिज्ञापत्र घेऊन आणि पंचयादी घालून वारसतपास करून, पंधरा दिवसांचा नोटीस कालावधी देऊन सातबारावर वारसांची नावे चढवतो, मी मात्र माझ्या मनातल्या सातबारावर या रायवळ चवीच्या वारसांची नावे नाहरकत केव्हाच चढवली आहेत.

Recent Comments

Pravin Joshi

24-04-2021 @ 09:08

अप्रतिम लेखन माझा प्रत्यक्षात आंबा उत्पादनाशी संबंध नाही. ना कोकणाशी. केवळ हापूस पायरीची चव माहित असणारा मी अस्सल शहरी माणूस. थाटात घरी बसून आंबा खाताना, पहिला चिक अंगावर पडू नये याची काळजी घेणारा. प्रत्येक आंबा खाताना संपणाऱ्या पेटीकडे पाहणारा. या लेखाने मला आंब्याच्या झाडाखाली बसवलं. विविध जातीच्या आंध्यांच्या आमराईची मनमुक्त सैर घडवली. आणि चवींमधली जातपातच मोडून काढली. तुम्ही हे आंब्यांचं गणगोत जपताय. त्यासाठी शुभेच्छा ! आणि हा चवदार लेख वाचायला पाठवलात त्यासाठी ...शतशः धन्यवाद !

सौ. अदिती पाध्ये

25-04-2021 @ 10:12

खूपच सुंदर लिहिलंय.लहानपणापासून मुंबईत असल्याने कोकणातल्या आंब्याचे वर्णन वाचून अगदी तिकडे गेल्यासारखे वाटले.धन्यवाद????

25-04-2021 @ 10:13

खूप छान लेख!

दिनेश दिलीप जोशी

25-04-2021 @ 10:13

कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता निसर्गाचा समतोल राखून तुम्ही कोकणबाग वाढवताय खूपच अप्रतिम आहे.जूने ते सोने म्हणतात ना ते खरं आहे दादा मला तुमच्याकडून समजले रायवळचे महत्त्व .कोकणातील रानसंंपदा तुम्ही अजूनही जपताय याचेच मला प्रशंसनिय वाटते आहे .ईच्छा आहे कोकणातील या संपदेला लुटण्याची आणि तिचा आस्वाद घेण्याची .? बुद्धीची चातुर्यता लेखनातून गोड स्वरूपात मांडलेली आहे .

Lalita Waghmode

25-04-2021 @ 10:13

अंत्यंत सुंदर लेखन .कोकणच्या पंरपरा ,वैभव सौंदर्य सारचं intresting आहे.खरोखर अशा देशी वांणांचे जतन करुन पुढच्या पिढीसाठी ज्ञानाचा ठेवा ज्वलंत ठेवावा.आपल्या कार्यास शुभेच्छा.

सुप्रिया देवस्थळी कोलते

25-04-2021 @ 10:13

छान लिहिलंय महेश,हापूसच्या मागणीपायी कोकणातले अनेक आंब्याचे प्रकार नामशेष व्हायला लागले आहेत,पायरी सुद्धा दिसत नाही आता जास्त,माझ्या आजी हापूस आंब्याबरोबर रायवळ किंवा पायरी थोडा मिक्स करून आमरस करायची,रसाला आंबटगोड चव यावी म्हणून, नाराळासारखा मोठा एक आंबा होता आमच्या गावी त्याला खोबरी आंबा म्हटलं जायचं आमच्या गावात. मी आता उत्तर भारतात राहते उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल,बिहार इथल्या आंब्याच्या जाती उदाहरणार्थ चौसा, लंगडा,मालदा, दशहरी,सिंदूरी मिळतात,उत्तर भारतात हापूस चं एवढं कौतुक नाही. इथे अजून आंब्यांची बऱ्यापैकी व्हरायटी टिकून आहे असं वाटत. तुझ्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मन कोकणात आणि तिथल्या रम्य आठवणीत फिरून आलं

Sunil borude

25-04-2021 @ 10:14

साहेब तुम्ही मला लहान पणीची आठवण करून दिली ,आमची पण छोटी बाग होती गावरान आंब्यांची जवळपास 20झाडे असतील ,त्याचा सुगंध पुन्हा ताजा झाला मला असा वाटायला लागलंय जपायला पाहिजे होती ती सगळी flavours आम्ही लागलो होतो केशर च्या चवीला जवळ घेत ,आमचे कडे 20वेगळी वेगळी जाती तील अंबे होते जसे की आमट्या ,द्राक्ष ,शेंदरी,कुबड्या , गो टी ,etc गावरान आंब्यांची मज्याच वेगळी ती ,खूप मस्त मांडलाय तुम्ही लेखातून

Pradnya Palsule

25-04-2021 @ 10:14

खूप च सूंदर , मला ही माझ्या लहानपणीची आठवण करून दिलीत, व आपोआप मन बालपणातील आजोळी गेलं.. तुमचा लेख मनाने मला डायरेक्ट कोकणात च घेऊन गेला , रायवळ आंबा याची आंबट चव मी कधी चाखली च नाही जी काही होती फक्त गोड व गोड, आणि हा आंबा कुठल्याच फळांच्या राजकारणात नाही पडला कधी पण तरी आपले स्वतःचे देशी अस्तित्व टिकवून आहे. आता वाट बघते तुमच्या कडून कधी हा गोडंबा पाठवत आहेत खायला , मला विकायला ही आवडेल. आंबे जोपासणी सोबतच तुम्ही मराठी शब्दाची जोपासना ही खूप छान केलीय. तुमचा हा लेख लोकांच्याही माहिती साठी शेअर करत आहे. ????

Add Comment