आम्ही जमीन खरेदीदार - गुंतवणूकदार मित्र

आम्ही जमीन खरेदीदार - गुंतवणूकदार मित्र

नमस्कार, अनेकदा आमच्या म्हणजेच नवजीवन ऍग्रो या आमच्या फर्मच्या जाहिराती सोशल मीडीयासह विविध माध्यमांतून प्रकाशीत होतात, या जाहिराती प्रकाशीत झाल्यावर हमखास विचारला जाणारा प्रश्न असतो, तुम्ही कोण ..... एजंट ...दलाल ..... जमीन मालक .... नक्की कोण .... या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच हा लेखनाचा प्रपंच आहे. मी स्वतः माझ्याकडे वा माझ्यामार्फत जमीन खरेदी करणा-या गुंतवणूकदारांसाठी त्यांचा विश्वस्तच असतो व आहे. मी स्वतः जमिनी खरेदी करतो, माझे पैसै, रक्कम, धन चांगल्या सुपीक, लाल मातीयुक्त जमिनीत गुंतवतो व अशीच जमीन मी माझ्याकडे किंवा माझ्यामार्फत वा आमच्या फर्ममार्फत जमिन घेऊ इच्छिणा-या मंडळींना विक्री करतो.

सध्याच्या प्रचलीत भाषेत कोणी याला ट्रेडींग म्हणेल किंवा कुणी या प्रकाराला लॅंड डीलींग म्हणेल. माझी भूमिका यापेक्षा वेगळी आहे, या सर्वाच्या पार पुढे जाऊन मला कार्यरत राहावं लागतं, यासाठीच हा लेखनाचा प्रपंच मी करीत आहे. मी महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई या नात्याने माझ्या फर्मकडे जमिन खरेदी करणा-या गुंतवणूकदारांचा सच्चा सोबती, मित्र, सल्लागार आणि सर्व प्रकारच्या सेवा पुरवठा करणारा एक व्यावसायीक आहे. आमच्या फर्मच्या माध्यमातून म्हणजेच मी किंवा माझे सहकारी यांच्या माध्यमातून जेव्हा ग्राहक किंवा गुंतवणूकदार कोकणात जमिन खरेदी करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्यांचा मी सर्वात जवळचा सहकारी असतो. मी एजंट, जमीन दलाल, ब्रोकर यापेक्षा जमीन खरेदीदार, जमीनीत गुंतवणूक करू इच्छिणा-या कुटुंबियांचा सल्लागार या नात्याने विश्वस्त या नात्याने व्यवहारात साक्षीदार असतो. कमीशन एजंट किंवा जमीन दलाल यांची जी भूमिका असते ती माझी भूमिका नसते. या मंडळींना माझा विरोध नाही, किंवा मी अशाप्रकारचा व्यवसाय करणा-या मंडळींना कमीही लेखू इच्छित नाही, मात्र कमिशन, दलाली, ब्रोकरेज मिळाल्यावर या मंडळींची भूमिका संपते.
आमच्या फर्ममध्ये जमिन व्यवहार झाल्यावर किंवा जमीन खरेदी झाल्यावर माझं व माझ्या सहका-यांचं कामकाज चालू होतं. मी स्वतः व माझे सहकारी ( सुमारे साठ ते सत्तर माणसांची माझी टीम आहे हे सांगायला मला आनंद वाटतो. ) आम्ही दिवसरात्र एक करीत शेती प्रोजेक्ट पूर्ण करतो. )

कोकणातच नव्हे तर अनेक ठिकाणी सध्या मजूरांची टंचाई आहे, शेतीकडील ओढा तरूणांचा कमी झालेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही, शेतीत भविष्य नाही म्हणून गावाकडून तरूणवर्ग गाव सोडून मुंबईला किंवा परगावी, परदेशी चालला आहे. गावातील वडीलधारे मुंबईत असतात, कोकणातील मंडळी तर अनेकदा गावं सोडून पीढ्यानपीढ्या बाहेरगावी स्थायीक झालेली आहेत. कोकणातीलच अशा काही मंडळींतील जमीनमालक काही जमीन घरगुती अडचणीसाठी विक्री करतात. काही मंडळी मुंबई किंवा परदेशी जाताना गावातील काही जमिन विक्री करून बाहेरगावी खोली घेणे, शिक्षणासाठी, नोकरी करताना काही मोठ्या खरेदीसाठी, लग्नकार्यासाठी गावाकडची जमिन विक्री करणाराही एक मालकवर्ग आहे.

आपणा सर्वांना सांगायला हवं की यातील कोणीही जमीन विक्री करून भूमीहीन वगैरे होत नसतो, आपल्या वाट्यातील काही भागच मालक विक्री करीत असतात. आपणाला हेही सांगायला हवं की यातील कुणाच्याही घरातील मंडळी शेतात राबण्याच्या वयाची नसतात किंवा असली तरी त्यांना स्वारस्य नसते. आपणाला मी हे एवढ्याचसाठी सांगतोय की या मडळींना जमीन विक्री करायचीच असते, मी नाही घेतली तर कुणीतरी दुसरा घेणाराच असतो. आम्ही नवजीवनने यासाठी आमच्या फर्मची स्थापना करून कोकणात एक अभिनव चळवळ सुरू केली. आमच्याकडे या माध्यमातून जमिनीची आवड असणारे वा ज्यांना आपली काही स्वप्नं साकार करायची आहेत अशा मंडळींनी जमिन घ्यायला सुरूवात केली. आमची चळवळ सुरू झाली या प्रकारातूनच. आपणाला सांगायला आनंद वाटतो की माझ्या फर्मकडे आजवर म्हणजे ऑगस्ट अखेर अचूकतेने सांगायचंच झालं तर पासष्ट एकर जमिन व्यवस्थापनाखाली आहे. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने व प्रोत्साहनाने लवकरच आम्ही शंभर एकर्सची शतकी खेळी करू असा मला विश्वास आहे.

कोकणात अनेक बदल होऊ घातलेले आहेत. कोकणात विमानतळ साधारण पुढीलवर्षी ऑक्टोबरपासून सुरू होईल, माझ्या कार्यक्षेत्रातच वैभववाडीचं रेल्वे टर्मीनस होऊ घातलेलं आहे, आमच्याच परिसरात तीन रेल्वे स्टेशन्स ( हॉल्ट स्टेशन सौंदळ, विलवडे, राजापूर रोड ) आमच्या कार्यक्षेत्राला लगतच आहेत. काही दिवसात येत्या कोकणरल्वे मार्गावरील सौंदळ स्टेशन पूर्ण विस्तारीत स्टेशन झाले तर सुमारे दोनशे पंधरा गावे जोडली जातील या स्टेशनला. राजापूर कोल्हापूर रोड दुरुस्ती व रुंदीकरण या माध्यमातून चांगला हायवे होत आहे. या सगळ्या आशावादी गोष्टी विचारात घेतल्या तर मी तुम्हाला आवाहन करतो की या जरा गावाकडे, या कोकणात माझ्या..... माझ्या कार्यक्षेत्राला भेट द्यायला यावं, माझ्या कामाची पाहणी करायला यावं.

आपल्या प्रश्नाला उत्तर देताना मला माझ्याबाबतीत आपणाला खूपच सविस्तर सांगायला लागलं. मी एक जमीन खरेदी करून पुन्हा ती विक्री करणारा विक्रेता तर आहेच पण या भूमातेची सेवा करणारा भूमीपुत्र आहे. कोकणच्या लाल मातीत घट्ट पाय रोवून उभा राहणारा, कोकणच्या लाल मातीत कामकाज करणारा, कोकण सोडून बाहेरगावी न जाणारा, कोकण सोडून न जाता परगावी जाऊन स्वतःचे घर बंद न ठेवणारा, माझ्याकडे कामकाज करणा-या सुमारे शंभर कामगार व कंत्राटदारांचा पोशींदा मी गावकरी. मित्रहो, नेटकरी मंडळींनो माझी ओळख आपणला तूर्तास तरी एवढी पुरे..... पुढील ओळख प्रत्यक्ष भेटीत होईलच....

आपल्याच येण्याच्या प्रतिक्षेत

  • प्रो.प्रा. महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई.
  • व्यवसायाची सुरूवात – 2009 पासून.
  • सध्या ग्राहक – 13 गुंतवणूकदार.
  • कार्यक्षेत्रातील जमिन – 65 एकर.
  • महेशचे वय – 35
  • जमिनीतली पीके – आंबा, काजू, बांबू, मसालापीके, केळी, नारळ. सीझनल कॅश क्रॉप्स.